औराद शा येथे बु. रणजीत हालसे यांची जयंती साजरी !


सवळा वर्ण, धष्टपुष्ट शरीरयष्टी, व्यवस्थित कोरलेल्या हनुवटी कडे मार्गस्थ असणाऱ्या लांब  मिश्या, गोंडस बालका सारखे हसू असणारे रणजीत हलसे काहींसाठी रंज्या हलसे परंतु माझ्यासाठी सम्राट हलसे. लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनीचे रणजीत हलसे त्या काळातल्या जयकरचे सर्वांना प्रिय असलेले व्यक्तिमत्व. लांबून जरी उग्र वाटत असले तरी जवळ गेल्यावर अतिशय उमद्या मनाचा राजा माणूस. रणजीत हलसेंचे बरेच किस्से प्रसिध्द होते. रणजीतचे बसणे, चालणे अशा अनेक गोष्टींवर जनार्धन कांबळे उर्फ जन्या, सिद्धार्थ टेंकाळे उर्फ पाप्या व लातूरचे बरेचसे मित्र वेगवेगळे किस्से सांगायचे. जयकरमध्ये प्रत्येकासोबत सुसंवाद असणारे हे व्यक्तिमत्व. यांनी कायम राज्यसेवाच दिली इतर वर्ग तीनच्या किंवा  पीएसआय/एस.टी.आय/असिस्टंट या परीक्षांचे साधे फॉर्म सुध्दा हलसे कधी भरत नव्हते. व्हायचे तर ‘वर्ग एक’ असा त्यांचा संकल्प असावा. कोणी भेटले की त्यांच्या शैलीत शुध्द मराठीत ते सांगायचे हा माझा तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता बरका. 



असे मिश्कीलपणे कोणाला पहिल्या फळीतला तर कोणाला दुसऱ्या फळीतला स्वतःचा कार्यकर्ता स्वतःच हलसे बनवून टाकायचे. वरून माझा कार्यकर्ता व्हायला भाग्य लागत बरका असे म्हणायचे. जयकरला असे त्यांचे विविध फळीतले कार्यकर्ते होते. हे पाहिल्यावर मी त्यांना सम्राट असेच संबोधू लागलो. कारण एख्याद्या सम्राटा सारखेच हा व्यक्ती रहायचा. एखद्याला बोलाविण्याची त्यांची शैली वेगळीच होती जेडी म्हणून मला बोलावयाचे असेल तर जे आणि डी या दोन्ही शब्दांना थोडे लांबवीत शुध्द मराठीत बोलायचे जसे जे.... डी... किंवा योगेश ला यो..गे..श.. असे. माझ्या माहिती प्रमाणे हलसेंनी कधीच कोणालाच नावाचा अपभ्रंश करून संबोधले नाही. 

जसे संग्रामला संग्र्या नव्हे तर संग्रामच, पाप्याला सिद्धार्थ असे त्यांच्या विशेष शैलीत संबोधायचे. कोणी जर हलसेंची मजा चार चौघात घेतली की हलसे त्याच्या कडे हसत पाहायचे आणि केवळ हम्म हा माझा तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता आहे थोडी मेहनत कर दुसऱ्या फळीत लवकरच येशील. असे बोलून नरागवता सम्राटांची स्वारी मंद हसू देत तिथून निघायची. तसे सम्राट हलसे भयंकर हजरजबाबी होते. हलसे मित्रांसोबत जितके रात्रभर गप्पा मारीत बैठक करायचे तितकीच मोठी अभ्यासाची बैठक यांची होती कारण हलसे एकदाही राज्यसेवा पूर्व नापास झाले नाहीत कायम मुख्य परीक्षेला असायचे हे विशेष. कायम आनंद करणारा, प्रत्येक वेळी राजकारणावर बोलणारा व्यक्ती म्हणून ते प्रसिध्द होते. 

पुढे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचा उपयोग रणजीत हलसेंना तसा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्यासाठी झाला नसला तरी पुढील आयुष्यात स्पर्धा परीक्षा व राजकीय अभ्यासाच्या जोरावर रणजीत आपले उदरनिर्वाहाचे साधन प्रबल करीत त्यांच्या भागातील राजकारणात एका पक्षाचे पदाधिकारी झाले. एकदा असेच मी लातूरला एका व्याख्यानासाठी गेलो होतो तिथे मी संग्रामकडे (वर्तमानातील किल्लारी महाविद्यालयातील प्राध्यापक व मराठवाडा जनक्रांती पक्षाचे संस्थापक डॉ. संग्राम मोरे) थांबलो होतो. रात्री लातूरच्या स्थानिक हॉटेल मध्ये जेवण घेतल्यावर आम्ही घरी निघालो होतो तेच वाटेत संग्रामला एक मोठी गाडी समोर उभी असालेली दिसली, संग्रामने त्या गाडी पुढे स्वतःची गाडी आडवी लावली. समोरच्या गाडीत सम्राट हलसे होते. संग्रामला व मला पाहत ते उतरले आमची गळाभेटझाली. नंतर नेहमी प्रमाणे सम्राट हलसे आणि संग्रामचे लातुरी पध्दतीती वाक् युध्द सुरु झाले दोघेही एकमेकांना त्यांच्या जातीवरून मोठ मोठ्याने चिडवीत बोलत होते. हे पाहून रस्त्यावरचे लोक थांबू लागले मला तर हे हॉस्टेल पासून नवे असे नव्हते. 

परंतु लोकांना कोण सांगेल? जवळून चाललेल्या व थांबलेल्या लोकांकडे पाहून मी बोललो अरे हे यांचे नेहमीचेच आहे. या दोघांनीही लोकांना भांडण वाटणारा यांचा संवाद थांबविला आणि मोठ्याने हसू लागले व गळा भेट घेऊ लागले. हे पाहून लोकांनी बहुदा आम्हाला वेडे ठरवीत शिव्याही घातल्या असतील परंतु याचे आम्हाला काय? आम्ही तर अनेक दिवसांनी भेटत होतो तसे दोन किंवा अधिक जयकरीयन जेंव्हा भेटतात तेंव्हा त्यांना जगाचा विसर पडतो आणि ते आपल्या जयकरच्या आठवणींमध्ये रमून जातात. या प्रसंगावरून एक मात्र कळले असेल की जात, धर्म, पंथ आम्हा जयकरीयनांना मैत्री पुढे गौण आहेत. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या जयकरीयनां मध्ये स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासानुसार किंवा प्रांतांनुसार गट पडत असतील परंतु जाती, धर्मांवरून आमच्यात कधी गटही पडला नाही की कधी जातीय व धार्मिक वादही झाला नाही. जातीचा उल्लेख आला असेल तर तो केवळ विनोदासाठी. लातूरला आमची भेट होईपर्यंत मला इतकेच माहित होते कि रणजीत हलसेंचे दोन पेट्रोल पंप आहेत म्हणून. पुढे राजकारणात त्यांनी बरीच प्रगती केली. 

एकदा समाज माध्यमावर रणजीत हलसेंनी विधानसभेची तयारी करावी असे खुद्द अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणात बोलल्याचा उल्लेख वर्तमान पात्रांनी केलेला पहिला. हे पाहिल्यावर मला खूप बरे वाटले म्हंटले सम्राटांनी आपले सम्राटपद धारण करण्याच्या दिशेने गतिमान पाऊले उचलण्यास सुरुवात केली बुवा. स्थानिक राजकरण, समाजकारण, व्यवसाय या सर्वांत दिवसेंदिवस प्रगती करणाऱ्या सम्राट रणजीत हलसेंची प्रगती बहुदा नियतीला मान्य नसावी की काय म्हणून एक दिवस अचानक बातमी आली की रणजीत हलसे आता आपल्यात नाहीत माझ्या तोंडून केवळ सम्राट इतक्या लवकर..... 

एव्हडेच शब्द त्यावेळी बाहेर पडले. स्पर्धा परीक्षांत आपले ध्येय्य सध्या करता आले नाही म्हणून रणजीत हलसे रडत बसले नाहीत तर ते नव्या उमेदीने नवीन क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजविण्यास सज्ज होते. अभ्यासू, हजरजबाबी, उत्तम वाक्चातुर्य, माणसे जोडण्याची कला, रागावर नियंत्रण, हसतमुख  अशा अनेक गुणांमुळे रणजीत हलसे एका मोठ्या राजकीय पदापर्यंत पोहोचणार होते परंतु काळाने केलेल्या क्रूर चेष्टेने ते आज आपल्यात नाहीत परंतु माझ्यासाठी व आम्हा जयकरीयनांसाठी ते सम्राट रणजीत हलसे म्हणून कायम स्मरणात राहतील.  
डॉ. जयेंद्र लेकुरवाळे उर्फ जे.डी./ जेड्या.

Comments

Popular posts from this blog

रणजीत हालसे यांचे दुःखद निधन ...!!!